चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

बापर्डे गावाची शैक्षणिक वाटचाल

आमचे भाग्य थोर की अगदी १०० वर्षांपूर्वी देखिल बापर्डे मधील ग्रामस्थ मंडळी शिक्षणाच्या बाबतीत सजग होती. शिक्षणाखेरीज गावाची प्रगती होऊ शकणार नाही हे त्याकाळच्या आमच्या पूर्वजांनी चांगले हेरले होते.

बापर्डे येथे पहिली शाळा ७ ऑगस्ट १९०९ साली स्थापन झाल्याचे दप्तरावरून कळते. ही इमारत जिथे आहे ती जागा सकपाळ बंधूंची. त्यांनी तोंडी समत्तीनेच ती ताबडतोब दिली. मग कै. कान्होजी महादेव नाईकधुरे यांच्या पुढाकारात गावातील सर्वानी लाकुडसामान व श्रमदान साहाय्य करून छोटीशी इमारत बांधली. मातीच्या भिंती व कौलारू छप्पर अशी रचना होती. वर्गांसाठी पार्टिशन केले जायचे. सरस्वती पूजनावेळी पार्टिशन काढून एकसंघ हॉल केला जात असे. नंतर तावडे मास्तर शाळेत आल्यावर त्यांनी एक मल्लखांब पुरून घेतला. जमीन मातीची असल्यामुळे दर शनिवारी मुले शेणाने सारवायची.

१९७८ पर्यंत या स्थितीत ही अशी प्राथमिक शाळा होती. नंतर ती जागा अपुरी पडू लागल्याने श्री. धोंडबाराव राणे यांनी पुढाकार घेतला व अमृतराव राणे हे पंचायत समिती सभापती असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून मंजुरी घेऊन दुसरी इमारत उभी केली. ती इमारत २००९ पर्यंत टिकली. थोडक्यात शाळेचे स्थलांतर पुढीलप्रमाणे –

बापर्डे शाळा नंबर १ – १९०७ ते १९४८ (पहिली ते चौथी)

पूर्ण प्राथमिक शाळा बापर्डे नंबर १ – १९४८ नंतर (पहिली ते सातवी)

तदनंतर बापर्डे ची लोकवस्ती वाढल्यामुळे गावात आणखी ३ शाळा वाढल्या. नाईक – धुरेवाडी येथे १ ली ते ४ थी, आणि जुवीवाडी येथे १ ली ते ४ थी अश्या नव्या दोन शाळा उभ्या राहिल्या. आवश्यकतेप्रमाणे जुवीवाडीची शाळा नंतर ७ वी पर्यंत वाढविली गेली. तसेच गावच्या रेडे टाक्यावरील धनगरवाडीच्या मुलांना सोपे जावे म्हणून तिथे ४ थी पर्यंत शाळा झाली. अशारितीने गावात एकुण चार प्राथमिक शाळा झाल्यामुळे पहिल्या-वहिल्या शाळेचे नामकरण १९९५ पासून केंद्रशाळा असे करण्यात आले.

२००८ साली, ग्रामस्थ व मुंबईकरांनी एकत्र येऊन या केन्द्र-शाळेचा शतक महोत्सव साजरा केला आणि त्यानंतर ही दुसरी इमारत देखील पाडून तेथे आता नवी एकमजली इमारत दिमाखात उभी केली आहे.

अशाप्रकारे बापर्डे मधील मुलामुलींची सातवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाची सोय १००/११० वर्षापर्यंत गावच्या सीमारेषेत होत राहिली. तरी माध्यमिक शिक्षणासाठी मात्र मुलांना मोंड, वाडा, खारेपाटण किंवा मुंबई येथे जाणे भाग पडे. ज्यांची मुंबईत राहण्याची सोय असे ती मुले मुंबईला प्रयाण करीत. परंतु ज्यांची सोय नसे ते सर्व गावात राहून मुख्यतः शेजारच्या मोंड हायस्कूलचाच आसरा घेत.

२००८ साली साजरा झालेल्या शताब्दी महोत्सवात उपस्थितांनी ही खंत वारंवार बोलून दाखवली व आपल्या गावातच माध्यमिक विद्यालय व्हावे असा निर्धार व्यक्त केला. त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी “श्री देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ” आणि मुंबईकरांनी “बापर्डे-जुवेश्वर ग्राम विकास मंडळ” अशा दोन वेगवेगळ्या संस्थांची स्थापना केली. आप्पा देऊ घाडीगांवकर यांनी २।। एकर जागा दिली, धोंडबाराव यशवंतराव राणे यांनी १५ लाख रुपये + डॉ. सुहास राणे यांच्या मार्फत इन्फोसिस फाऊंडेशनने १० लाख रुपये, तसेच मुंबईकर व ग्रामस्थांनी पाच हजारांपासून लाख-दोन लाखांपर्यंतच्या देणग्या देऊन “श्री देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाची यशवंतराव राणे” हायस्कूलची एकमजली सुंदर व आकर्षक अशी भव्य इमारत उभी केली.

अशा रीतीने बापर्डे ग्रामवासीयानी २०१२ पासून दिमाखात आपले हायस्कूल उभे करून ८ वी , ९ वी व १० वी चे वर्ग चालू केले. सध्या गावातील ७०-८० मुले या हायस्कूल मार्फत माध्यमिक शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव