चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

बापर्डे-जुवेश्वर ग्राम विकास मंडळ, मुंबई

बापर्डे-जुवेश्वर हे आमचे गाव सिंधुदुर्ग जिल्यातील देवगड तालुक्यात दुर्गम भागात वसलेले आहे. साधारण सन १९७५-७६ पर्यन्त गावाच्या पंचक्रोशीतसुद्धा इयत्ता ७वी नंतर माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. तदनंतर बाजूच्या मोंड, मुटाट, पेंढरी या गावात माध्यमिक शाळा आल्या.

पण दररोज १०-१२ किलोमीटर पायपीट करून शेजारच्या गावात जाऊ शकत नाही, किंवा मुंबईसारख्या शहरात पुढच्या शिक्षणासाठी जायची ऐपत नाही अशा मुलांच्या, विशेषता मोठ्या प्रमाणावर मुलींच्या शिक्षणाची इतिश्री ७वी पर्यन्त जिल्हा परिषद शाळेतच व्हायची.

याच आमच्या पूर्ण प्रार्थमिक जि.प.शाळेचा सन २००८ साली शताब्धी-सोहळा भरगच्च कार्यक्रमासह उत्साहात साजरा झाला. गावातील बरेच मुंबईकर आपल्या प्राथमिक शाळेच्या ओढीने आणि आपल्या बाबांची, काकाची, आत्याची पहिली शाळा पहायची असल्याने त्यांची तरुण मुलेही या शताब्धी सोहळ्यात मोठ्या ऊत्साहात सहभागी झाली. याच सोहळ्यामधे आताचे मुंबईकर आपल्या बालपणीच्या सवंगड्य़ाना एकत्र भेटले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपण मुंबईतही एकत्र येणे, भेटणे गरजेचे आहे, या भावनेने मुंबईत दि. ९ जाने. २०११ रोजी परेलच्या शिरोडकर हायस्कूल मध्ये एक बैठक घेऊन बापर्डे-जुवेश्वर ग्राम विकास मंडळाची स्थापना झाली.

अर्थात या मंडळाचा मुख्य हेतू गावातील मुलांना गावातच माध्यमिक शिक्षण मिळावे आणि पुढील उच्च शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी असा होता. म्हणूनच गावात श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाची स्थापना झाली. ग्रामस्थ व मुंबईकरांच्या आग्रही सहभागाने जून २०११ मध्ये ८वी च्या वर्गासह माध्यमिक शाळेची सुरवात झाली, पुढच्याच वर्षी सन २०१२ साली आप्पा देऊ घाडीगावकर विद्यानगरीत संस्थेच्या जागेत, तात्पुरती इमारत बांधून आणि कोणत्याही सरकारी अनुदान मदतीशिवाय, सन २०१४ साली १२ वर्ग खोल्यासह सुसज्ज इमारतीमधील यशस्वी वाटचाल करणार्‍या यशवंत राणे माध्यमिक विद्यालयाच्या उभारणीत बापर्डे-जुवेश्वर ग्राम विकास मंडळाचा सिंहाचा वाटा आहे.

आमचा बापर्डे-जुवेश्वर गाव तसा शांत, मवाळ, भांडणतंटा, वाद, कोर्टकचेर्‍या यात फारसा नसलेला. गावातील वार्षिक गावरहाटीचे वार्षिक उत्सव जरी सुरू नसले तरी गावची ग्रामपंचातय निवडणूक कित्येक वर्षापासून बिनविरोध होत असल्याने गावात रुढ अर्थाने एकोपा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे गावातील कोणीही गावाबाहेर कुठेही भेटले की गावाबद्दल आत्मीयतेने बोलणार, एकमेकांची आस्थेने चौकशी करणार.

बापर्डे-जुवेश्वर ग्राम विकास मंडळाची मुंबईत गावापासून ४५० किलोमीटर दूर झालेली स्थापनाच बापर्डे-जुवेश्वर गावाच्या पक्षीय राजकारण आणि जाती-पाती विरहीत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास घडवून आणणे यावर आधारलेली आहे. स्थापनेनंतर मंडळाचे उद्देश, ध्येय, घटना आरेखितत करताना गावचा सर्वांगीण विकास सर्वांच्या मनात द्रुढ होता. सुरवातीसच मैलाचा दगड ठरलेल्या श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ संचलीत यशवंत राणे माध्यमिक विद्यालयाचा आर्थिक भार सांभाळण्याचे मोठे काम मुंबईकरांवर म्हणजेच पर्यायाने बापर्डे-जुवेश्वर ग्रामविकास मंडळावर आले.

गावात स्थापन झालेल्या श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाकडून २०११-१२ साली सुरू झालेली माध्यमिक शाळा रीतसर सरकारी मान्यता मिळून पुढे शासकीय धोरणाप्रमाणे अनुदान प्राप्त होईल ही आशा महाराष्ट्र सरकारच्या २०१२-१३ सालानंतरच्या एका पाठोपाठ एक झालेल्या धर-सोड निर्णयामुळे मावळली. आमच्या स्वप्नातले माध्यमिक विद्यालय स्थापनेपासून अद्याप आणि कदाचित दूरवर भविष्यातही स्वयम अर्थसहाय्य तत्वावर म्हणजे लोकवर्गणी, प्राप्त आर्थिक मदतीतूनच खर्च करून सुरू ठेवावे लागेल हे आता नक्की झालेले आहे.

गावातील यशवंत राणे महाविद्यालयाच्या साधारण १० लाख रुपये वार्षिक खर्चाचा बहुतांश भार मुंबईकर मंडळी म्हणजेच बापर्डे-जुवेश्वर ग्राम विकास मंडळ विविध उपक्रमातून आर्थिक मदत गोळा करून उचलत आहेत. यासाठी तळमळीने झटणारे बरेच कार्यकर्ते बापर्डे-जुवेश्वर ग्राम विकास मंडळाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम पार पाडत आहेत आणि वार्षिक खर्चासाठी आर्थिक मदत गोळा करीत आहेत. इतकेच नाही तर आपल्या माध्यमिक शाळेत शिक्षणाचा दर्जा उच्च राहावा, मुलांनी सर्वांगीण प्रगती करावी यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रमही खर्च करीत आहेत.

शिक्षण-प्रसाराच्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या या मंडळाच्या स्थापनेच्या काळातील कार्यकर्ते सर्वश्री वासुदेव नाईकधुरे, श्रीधर मोन्ड्कर, सुर्बाजी गायकवाड, रत्नाकर गायकवाड, असे काही जुने कार्यकर्ते वयोमानपरत्वे पदावरून निवृत्त झाले असले तरी आता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडीत आहेत. त्यांची जागा नव्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

संस्थेच्या दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजीच्या सर्वसाधारणसभेत पुढील कार्यकारीणीची निवड करण्यात आली आहे.

श्री. सुधीर अनाजी नाईकधुरे, अध्यक्ष श्री. अंबाजी सखाराम राणे, कार्याध्यक्ष
श्री. सत्यवान नाईकधुरे, उपाध्यक्ष डॉ. श्री.सुहास राणे, खजिनदार
श्री. विजय सखाराम गुरव, सरचिटणीस श्री. प्रसाद नाईकधुरे, सहचिटणीस
श्री एम.बी.नाईकधुरे, हिशेब तपासणीस श्री. कृष्णा फाळके, सहचिटणीस

कार्यकारिणी सदस्य

श्री. श्रीकृष्ण गायकवाड, श्री. राजेंद्र नाईकधुरे, श्री. नरेंद्र राणे, श्री. गोविंद वेद्रुक, श्री. अमोल नाईकधुरे, श्री. उमेश घाडी, श्री. संजय नाईकधुरे, श्री. हरीदास पांडुरंग लाड

मंडळाच्या कार्यकर्त्याची गावाप्रती असलेली ओढ आणि आत्मीयता अशीच अबाधित राहणार यात शंका वाटत नाही.

(शब्दांकन : श्री. विजय गुरव
सरचिटणीस : बापर्डे-जुवेश्वर ग्रामविकास मंडळ, मुंबई)

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव