चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

शताब्दी महोत्सव २००८

मानवी बुध्दीचा विकास होण्यामागे मुख्य घटक शिक्षणच असते- हे ब्रीदवाक्य ठरवून बापर्डे गावच्या त्यावेळेच्या सुजाण ग्रामस्थांनी ७ ऑगस्ट १९०९ साली प्राथमिक शाळेची स्थापना केली. अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत सर्व ग्रामस्थाना एकत्र करण्याचे कठीण काम कै. महादेव कान्होजी ना. धुरे यांनी करून, सकपाळ बंधूनी दान केलेल्या जागेवर शाळॆसाठी छोटी इमारत बांधली. तदनंतर १९७७-७८ च्या दरम्यान श्री. धोंडबाराव राणे व पंचायत समितीचे तेव्हाचे सभापती अमृतराव राणे यांच्या नेतृत्वाखाली नवी इमारत बांधून घेतली.

तर या आमच्या प्राथमिक शाळेला शंभर वर्षे होणार ही कल्पनाच सुखावह होती, त्यामुळे तीचा शतक महोत्सव साजरा करावा ही कल्पना पुढे आली व १५ ऑगस्ट २००८ (स्वातंत्रदिन) या दिवशी शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ, मुंबईकर यांच्या विचाराने या महोत्सवाचे आकर्षण म्हणून “शतपूर्ती” या नावाने स्मरणिका प्रकाशित करण्याचे ठरले. यासाठी गावी स्थानिक पातळीवर पुढीलप्रमाणे सल्लागार समिती स्थापन करण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शक – श्री. अमृतराव तथा दादासाहेब राणे

अध्यक्ष – श्री. श्रीकांत साबाजी नाईकधुरे, कार्यवाह – श्री. सुरेश म. अफंडकर

निधी संकलन प्रमुख – श्री. विठ्ठलराव स. नाईकधुरे, कोषाध्यक्ष – श्री. आबाजी शंकर राणे.

सरपंच, ग्रापं. बापर्डे – सौ. अपेक्षा गुणवंत राणे.

पोलीस-पाटील, बापर्डे – घन:श्याम ग. नाईकधुरे

सल्लागार मडंळ : सर्वश्री – धोंडबाराब य. राणे, सखाराम शं. नाईकधुरे, काशिराम भा. घाडी, हनुमंत बा. लाड, सखाराम भा. घाडी, बाळकृष्ण दि. नाईकधुरे, अनाजी ना. नाईकधुरे, अनंत ल. घाडी, विजय दा.सकपाळ, बाळकृष्ण गो. नाईकधुरे.

मुंबईचे निमंत्रक – श्री. वासुदेव बा. नाईकधुरे, डॉ. सुहास राणे व अन्य ४० सदस्य ज्यांनी मोलाचे योगदान केले.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीचे थोडे सिंहावलोकन होणे जरुरी आहे : मी स्वत: १० वर्षांहून अधिक काळ नाईकधुरे विकास मंडळ, मुंबई – बापर्डे या संस्थेचा सरचिटणीस होतो. त्या काळात माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण बापर्डे गावच्या संघटित एकीचे स्वप्न तरळत होते. नंतर या संस्थेचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करीत असताना सहयोग-राणेवाडी मुंबई, यांचे कार्य मला आकर्षित करीत होते. त्यावेळी त्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी असलेले प्राध्यापक सुहास राणे यांचेशी संपर्क साधला तर आपण संपूर्ण बापर्डे – जुवेश्र्वर गाव मुंबईत एकत्र आणू शकू अशी खात्री पटली होती. म्हणून ज्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी योगदान खूप मोठे आहे, त्या डॉ. सुहास राणे यांचेशी सविस्तर चर्चा केली आणि शताब्दी महोत्सव आखणीसाठी नाईकधुरे विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही शिरोडकर हायस्कूल, परेल येथे संपूर्ण बापर्डे गावाची सभा आयोजित केली.

गावाच्या या पहिल्या-वहिल्या मुम्बईतील सभेस एकंदर १४० पेक्षा जास्त मुंबईकर उपस्थित होते. विषय एकच होता आणि तो म्हणजे संपूर्ण बापर्डे गाव संघटित करून सर्वांनी चांगले विचार घेऊन एकत्र यावे. गावच्या सामाजिक शैक्षणिक कार्याला सर्वांनी हाताभार लावावा.

सभेत मी प्रास्ताविक केले. श्री. दिनेश धुरे -सेक्रेटरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डॉ.सुहास राणे यांनी सविस्तर विवेचन करून “एकमेका सहाय्य करूं, अवघे धरू सुपंथ” या संतवाणीवर शिक्कामोर्तब करून, प्रत्येक वाडीवरचे प्रतिनिधी नेमून, बापर्डे-जुवेश्वर गावातील मुंबईवासियांचे पत्ते व फोन नंबर मिळवून पून्हा एक मोठी सभा लावूया असे सांगितले. सारांश, मुंबईवासिय ग्रामस्थांच्या संघटित एकीचे बीज ह्या सभेत पेरले गेले व यामुळेच पुढे होणाऱ्या शताब्दी महोत्सवास सारे मुंबईकर सर्व सामर्थ्यानिशी सज्ज झाले. या सभेत मुंबईच्या काही ग्रामस्थानी आपली मनोगते व्यक्त करून एकंदरीत जोरदार पाठिंबा दर्शविला.

यानंतर, शताब्दी समारंभाच्या पूर्वतयारीसाठी श्री. श्रीकांत नाईकधुरे यांच्या समवेत सल्लागार समितीचे इतर सहकारी मुंबईत आले. काही निवडक लोकांची ही सभा डॉ. सुहास राणे यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी झाली. शताब्दी महोत्सवाबाबत सविस्तर चर्चा झाली. जाहिराती व देणग्या मिळविण्यासाठी नन्तर एक मोठी सभा मुंबईत आयोजित करून सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सभेस उपस्थित रहावे असे ठरले.

या प्रमाणे नंतर २ ऑक्टोबर, २००८ (गांधी जंयती) या दिवशी मुंबई-स्थित सारे बापर्डे-जुवेश्वरकरी संघटित होवून शिरोडकर हॉल येथे एकत्र जमले, हॉल गच्च भरला होता. ही खरी गावच्या एकीची झलक होती. वेगळ्याअर्थाने बापर्डे हा एक “श्रीमंत गाव” आहे हे पटले. जवळ जवळ ५० पेक्षा जास्त मुंबईकरांनी आर्थिक योगदान केले आणि १०० वर्ष जुन्या असलेल्या शाळेची शताब्दी महोत्सवासाठी सारे मुंबईकर सज्ज झाले.

मुंबईतील य़ा दोन्ही सभाना गावच्या विवीध वाड्य़ान्चे प्रतिनीधी सर्वश्री – श्रीधर मोन्ड्कर, सुर्बाजी गायकवाड, हरिदास लाड, सकपाळ इ. मन्डळी हज़र होती.

शताब्दी महोत्सव साजरा करण्याची मूळ उद्दिष्ट्ये :

१) पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बापर्डे नं. १ च्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा १०० वर्षांच्या आठवणींना वक्तृत्वाच्या आणि स्मरणिकेच्या माध्यमातून उजाळा देणे.
२) गेल्या अनेक वर्षातील आजी-माजी शिक्षकाना निमंत्रित करून जुन्या आठवणीना उजाळा देणे, त्या आठवणी कथण्य़ासाठी त्यावेळच्या कडक शिस्तीच्या शिक्षकाना त्यांची मनोगते मांडण्याची संधी देणे.
३) अत्यंत महत्त्वाच उद्देश : बापर्डे-जुवेश्वर या जोडगावात खूप मोठी लोकसंख्या आहे. पण गावात हायस्कूल नव्हते. हायस्कूलला जाण्यासाठी मुलांना ५ कि.मी.पेक्षा जास्त पायी प्रवास करावा लागत असे. मुंबईत झालेल्या प्रत्येक सभेत याचे खूप पडसाद पडले. या पार्श्वभूमीवर या सोहळ्यास उपस्थित होणाय़ा अनेक राजकीय नेत्यांसमोर, नागरिकांसमोर या सोहळ्याच्या व्यासपीठावरून हायस्कूलची मागणी करणे.
४) बापर्डे गावात व मुंबईत सामाजिक प्रबोधन करणारे, राजकीय क्षेत्रात नेत्रदिपक यश संपादन करणारे, शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक, प्राध्यापक या नात्याने उज्ज्वल यश संपादन करणारे, व्यवसायात खूप यश मिळविलेले व्यापारी, तसेच शैक्षणिक संस्था, पतपेढी संचलन व पोलीस दलात नाव कमावलेले अनेक मान्यवर व नामवंत याच शाळेने निर्माण केले, या सर्वाना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून त्यांचे मार्गदर्शन घेणे, भविष्यात हायस्कूलसाठी आर्थिक योगदान मिळवणे. शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ ह्यांना आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरं, नेत्र चिकित्सा शिबिर आयोजन कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविणे.
५) येन केन प्रकारेण सारा बापर्ड-जुवेश्वर गाव एकत्र आणणे. भविष्यातील पुढच्या अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील असा शताब्दी महोत्सव कार्यक्रम साजरा करणॆ, शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांकडून गावच्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी व हायस्कूल इमारत बांधण्यासाठी आर्थिक योगदान करणारे दानशूर, जाहिरातदार शोधणे.

शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम:

संपूर्ण महोत्सवाचे प्र. मार्गदर्शक: श्री. अमृतराव तथा दादा राणे, मा.आमदार, सूत्रसंचालन : प्रा. सुहास राणे, आणि कार्यवाही श्रीकान्त नाइक-धुरे व सहकारी.

शुक्रवार २१ नोव्हेंबर, २००८

महिला मेळावा, हस्तकला प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, बचत गटाना मार्गदर्शन (वक्ते अविनाश माणगांवकर), हळदी कूंकु समारंभ, गीत गायन स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा (गाव मर्यादित)

शनिवार २२ नोव्हेंबर, २००८

सकाळी: आरोग्य तपासणी, रक्तदान, नेत्रचिकित्सा शिबिर, विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
दुपारी व सायन्काळी : भव्य शताब्दी महोत्सव समारोह व स्मरणिका प्रकाशन,
उपस्थिती: सर्वश्री दादा राणॆ, कुलदीप पेड्णॆकर, अजित गोगटॆ, राजन तेली, जनार्दन तेली, जयेन्द्र राव-राणॆ, रविन्द्र फाटक, प्रमोद जठार, वैभव नाईक इ. मान्यवर.
रात्रौ : सुगम संगीत रजनी (कोल्हापूर) – श्री. शशिकांत सुतार, श्री. चंदू मयेकर (फोंडा), मंदार केळकर (वाडा-फणसे यांचा हास्य दरबार)

रविवार दि. २३ नोव्हेंबर, २००८

स. ९.३०- १२.३०: स्नेहमेळावा (बापर्डे-मुंबई ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ); माजी शिक्षकांचा भव्य सत्कार
दु. ३ ते ६.०० व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन – वक्ते मा. डॉ. भारत भोसले, प्रा. सुहास राणे, प्रा. श्रीनिवास नाईकधुरे, सौ. शोभा राणे.
रात्रौ ९.०० ते १२.०० एकांकिका (मुंबई), एकांकिका (ग्रामीण)

अशा रितीने हा तीन दिवसाचा भव्य समारोह यशस्वीरीत्या पार पडला.

(शब्दांकन: श्री. वासुदेव बाळकृष्ण नाईकधुरे.
माजी अध्यक्ष : बापर्डे-जुवेश्वर ग्रामविकास मंडळ, मुंबई)

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव