विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षणासोबत विविध उपक्रम प्रशालेत राबविणे अत्यंत आवश्यक असते. हेच महत्वाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आमच्या प्रशालेमार्फत दरवर्षी विविध सहशालेय उपक्रम राबविले जातात. सदर सहशालेय उपक्रमात आमच्या प्रशालेतील सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग तसेच सर्व विद्यार्थी अत्यंत आवडीने भाग घेऊन हे सर्व उपक्रम यशस्वी करतात.
सन 2022-23 मध्ये आमच्या प्रशालेमार्फत वर्षभर पुढील सहशालेय उपक्रम राबविण्यात आले.
सन 2022-23 मध्ये आमच्या प्रशालेमार्फत वर्षभर पुढील सहशालेय उपक्रम राबविण्यात आले.
1) 15 जून 2022 – प्रवेशोत्सव कार्यक्रम*
सदर दिवशी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असल्याने प्रशालेत नवीन विद्यार्थी वर्गाचे स्वागत करण्यात येते. आमच्या प्रशालेत या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता 6 वी आणि 7 वी हे वर्ग नव्याने सुरु करण्यात आलेले असल्याने संस्थेमार्फत आणि प्रशालेमार्फत नवीन विद्यार्थी वर्गाचे वह्या आणि पुस्तके वाटून जोरदार वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
2) 21 जून 2022 – जागतिक योग दिन
संपूर्ण जगभरात हा दिवस अगदी मोठ्या उत्साहात “जागतिक योग दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो. आमच्या प्रशालेमार्फत या दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात साजरा केला.सदर उपक्रमात प्रशालेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांनी सहभाग दर्शविला.
3) 22 जून 2022 – एस एस सी विद्यार्थी गुणगौरव समारंभ
शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा निकाल ( एस. एस. सी ) निकाल बोर्डमार्फत जाहीर झाल्यानंतर प्रशालेमार्फत सर्व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
4) 13 जून 2022 – गुरुपौर्णिमा
गुरु आणि शिष्याच्या नात्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा हा दिवस मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो. आपल्या गुरूंच्या कार्याला वंदन करण्यासाठी प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे आमच्या प्रशालेचे विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाची तयारी आमच्या प्रशालेतील सर्व विद्यार्थी करतात. यादिवशी आपल्या गुरूंच्या प्रती सर्व विद्यार्थी मनोगतामधून आदर व्यक्त करतात. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांमार्फत गुरुपौर्णिमा या दिवसाचे महत्त्व सांगणारी छोटी नाटिका साजरी केली जाते.
5) 1 ऑगस्ट 2022 – लोकमान्य टिळक पुण्यतिथी
आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अश्या या थोर राष्ट्रीय नेत्यांच्या कार्याची ओळख सर्व विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी प्रशालेमध्ये दरवर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी केली जाते. या दिवशी विद्यार्थी आपली मनोगते व्यक्त करतात. तसेच दरवर्षी या दिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये वक्तृत्व आणि समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या सर्व स्पर्धांचा आनंद गावातील सर्व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालकवर्ग, संस्था प्रतिनिधी आवर्जून घेतात.
6) 11 ऑगस्ट 2022 – रक्षाबंधन
बहीण भावाच्या अतूट नात्याचा क्षण म्हणजे रक्षाबंधन. या दिनाचं महत्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने आमच्या प्रशालेत दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. सदर दिवसाचे औचित्य साधून आमच्या प्रशालेत सर्व विद्यार्थी एक मेकांना राख्या बांधून बहीण – भावाच्या सुंदर नात्याची ओळख करून देतात. तसेच पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे हेच मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रशाळेमार्फत वृक्षाला राखी बांधण्यात येते आणि पर्यावरणाप्रती आपले ऋण विद्यार्थी व्यक्त करतात.
7) 15 ऑगस्ट 2022 – स्वातंत्र्य दिन
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली असल्याने संपूर्ण देशभर अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत होते. आमच्या प्रशाळेमार्फत देखील एखाद्या परेड ग्राऊन्ड्वर ज्याप्रमाणे संचालन करण्यात येते अगदी त्याप्रमाणे आमच्या प्रशालेतील विद्यार्थी सुंदर संचालन करतात. अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आमच्या प्रशालेत विविध स्पर्धा जसे की रांगोळी स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी घेण्यात आल्या आणि हा अमृत महोत्सवी स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला.
8 ) 5 सप्टेंबर 2022 – शिक्षक दिन*
या दिवशी आमच्या प्रशालेतील सर्व विद्यार्थी स्वतः शिक्षक बनून त्या दिवसाचे संपूर्ण शालेय कामकाज पाहतात. एक आगळावेगळा अनुभव या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्राप्त होतो.
9) 3 ऑक्टोबर 2022 – सरस्वती पूजन कार्यक्रम
विद्येची देवता सरस्वती मातेच्या पूजनाचा हा दिवस आमच्या प्रशालेत खूप छान प्रकारे साजरा करण्यात येतो. या दिवशी प्रशाळेमार्फत संपूर्ण दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये सरस्वती माता पूजन, ढोलवादन, विद्यार्थी स्टॉल, मुलींच्या फुगड्या, गरबा, भजन, मजेशीर खेळ इत्यादी कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येतो.
10) 29 ऑक्टोबर 2022 – एकांकिका सादरीकरण – दामोदर हॉल परेल
दरवर्षी बापर्डे- जुवेश्वर ग्रामविकास मंडळ मुंबई च्या वतीने मुंबई मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. सदर स्नेहसंमेलनात नाईकधुरे विकास मंडळ मुंबई यांनी प्रायोजित केल्याने आमच्या प्रशालेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी ” लॉटरी ” नावाची सुंदर एकांकिका साजरी केली. दामोदर हॉल परेल सारख्या मोठ्या रंगमंचावर कार्यक्रम आमच्या प्रशालेतील शिक्षक आणि कर्मचारी यांनी साजरा केला.
11) 9 नोव्हेंबर 2022 – पदमश्री डॉ. सुधा मूर्ती मॅडम कार्यक्रम
दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या प्रशालेला स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शाळा सुरु करण्याची शासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रशालेचा औपचारिक उदघाटन सोहळा करण्यात आला.आमच्या प्रशालेचा सदर उदघाटन सोहळा पदमश्री डॉ. सुधा मूर्ती मॅडम यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. त्या अनुषंगाने प्रशालेत भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी माननीय श्री
प्रजीत नायर ( IAS – CEO सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र शासन ) तसेच डॉ. सुरेश जोशी ( हृदयरोग तज्ज्ञ -जसलोक रुग्णालय ) विशेष उपस्थित होते.
12) 17 जानेवारी 2023- क्रीडा महोत्सव
दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या वार्षिक क्रीडामहोत्सवात जवळपास सर्वच वैयक्तिक आणि सांघिक खेळाचा अंतर्भाव करण्यात येतो.या संपूर्ण स्पर्धेतून एक विद्यार्थी *बापर्डे चषक*चा मानकरी ठरत असल्याने हा ‘किताब मिळविण्यासाठी सर्वच विद्यार्थी खेळामध्ये उत्तम सहभाग दर्शवितात.
13) 11 फेब्रुवारी 2023 – लोकबिरादरी आश्रम शाळा कार्यक्रम
कोकणातील मुलांचे शिक्षण कश्याप्रकारे असते याची ओळख होण्यासाठी खास लोकबिरादरी आश्रम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ( बाबा आमटे स्कूल ) आमच्या शाळेला सादिच्छा भेट दिली.
13) 26 जानेवारी 2023 – प्रजासत्ताक दिन कार्यक्रम व देवगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन
आमच्या प्रशालेत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा काण्यात येतो. सदर दिवसाचे औचित्य साधून आमच्या प्रशालेमार्फत प्रभातफेरी आणि शालेय स्वच्छता आयोजित करण्यात येते.
सदर दिवसाचे औचित्य साधून आमच्या प्रशालेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ सुहास राणे यांच्या सहकार्यातून पहिल्यांदाच देवगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
14) 28 फेब्रुवारी 2023 – निरोप समारंभ
दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहात शुभेच्छापर निरोप समारंभाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दहावीचे सर्व विद्यार्थी शाळेला एक आठवण भेट वस्तुरूपात देऊन आपले प्रशाळेप्रती प्रेम व्यक्त करतात.
15) 24 मार्च 2023 – व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आयोजन
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशाळेमार्फत सौ.सुप्रिया निकम मॅडम यांच्या पुढाकारातून खास व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.